आशपाक पठाण / लातूर
औसा : देशात शांतता, सामाजिक सलोखा, भाईचारा कायम ठेव, प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी नांदू दे, कुरआनच्या शिकवणीची अंमलबजावणी तंतोतंत व्हावी, यासाठी प्रेरणा दे, अजाणतेपणी झालेल्या चुकांबद्दल क्षमा कर, ईश्वराने दाखविलेल्या मार्गावर चालण्यासाठी सर्वांना सद्बुद्धी दे, भरकटत चाललेल्या तरुणाईला चांगला मार्ग दाखव, अशी प्रार्थना औसा येथील इज्तेमाच्या समारोपात लाखो समाजबांधवांनी केली.
यावेळी अनेकांच्या डोळ्यातून अश्रूही वाहिले. तबलिगी जमातच्या दोन दिवसीय इज्तेमाचा मंगळवारी रात्री ९ वाजता समारोप झाला. मौलाना फारुखसाब यांनी दुआ केली. ईश्वराचे नामस्मरण, नमाज, कुरआन पठणात जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. शेजारी कोणीही असो, त्यासोबत सलोख्याने वागणे हीच इस्लामची शिकवण आहे. प्रत्येकाने आपल्या आचरणातून सामाजिक सद्भाव, बंधुभाव वाढीस येईल, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. नमाज पठण, कुरआनचे वाचन, आई-वडिलांशी सद्वर्तनाने वागणे, वृद्धांची काळजी घेणे, लहान मुलांवर प्रेम करणे ही इश्वराची शिकवण आहे, यावर अधिक भर देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही प्रार्थना करण्यात आली.
आई-वडिलांचा विसर पडू देऊ नका...
आज मनुष्य चुकीच्या मार्गावर जात असून, तरुणांना आई-वडिलाचा विसर पडला. शेकडो वयोवृद्ध माता-पिता रस्त्यावर फिरतात. हे दृश्य फारच वाईट आहे. परमेश्वरा तूच आम्हाला योग्य दिशा दाखव, जे आजारी आहेत त्यांना आजारमुक्त करून सुखरूप घरी पाठव. जे लोक प्रवासात, गुन्हेगारीत, कर्जाच्या ओझात दबलेले आहेत त्यांची सुटका कर. महिलांचे रक्षण कर, अस्मानी व सुलतानी संकटापासून सुटका कर, अशी प्रार्थना करण्यात आली.
ओ साथी, दुआओं मे याद रखना...
सामुदायिक प्रार्थना झाल्यानंतर लाखोंचा जनसमुदाय जवळपास दीड तासात मार्गस्थ झाला. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. “साथी धीरे से, दुआओ मे याद रखना” म्हणत जड अंत:करणाने निरोप देत होते. कुणालाही त्रास होऊ नये, याकरिता शेकडो स्वयंसेवकांनी मानवी साखळी करून वाहतूक सुरळीत केली. पोलिस प्रशासनाने औसा-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग काही वेळेकरिता बंद केला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"