उदगीर (जि.लातूर) : उदगीर नगर परिषदेचे बोगस शिक्के व सह्या करून बनावट बांधकाम परवाने देणाऱ्या टोळीविरुद्ध उदगीर शहर पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या अभियंत्यांनी २५ पानांची फिर्याद पोलिसांना पाेस्टाद्वारे पाठविल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
उदगीर शहरातील अनेक भूखंडावर बांधण्यात येणाऱ्या टोलेजंग इमारतींचा बोगस बांधकाम परवाना काढून देणारी व खुल्या जागांचे नामांतर करून देणारी टोळी उदगीर शहरात कार्यरत आहे. या टोळीने नगर परिषद कार्यालयाचे बनावट शिक्के व सह्याचा वापर करून अर्जदारांना बांधकाम परवाने, गुंठेवारी प्रमाणपत्र व खुल्या जागांचे नामांतर करून देवून शासनाची व उदगीर नगर परिषदेची फसवणूक करून आर्थिक नुकसान या टोळीने केले आहे. याबाबत नगर अभियंता एस.एन. काझी यांनी वेळोवेळी शहर पोलिसांना सदरील प्रकरणात फिर्याद देवूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे.
पोस्टाद्वारे पाठविली फिर्याद...उदगीर पालिकेचे नगर अभियंता एस. एन.काझी यांनी वेळोवेळी शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद घेवून गेले असता पोलिसांनी सविस्तर माहिती नमूद करण्यासंदर्भात पालिकेस पत्रे दिलेली आहेत. पोलिसांनी ही फिर्याद घेतली नसल्याच्या कारणावरून नगर अभियंता एस. एन. काझी यांनी २५ पानांची फिर्याद पोस्टाने पाठविल्यानंतर शहर पोलिसांनी कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भा. दं.वि. व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(सी), ७३,७४ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक खेडकर हे करीत आहेत.