मुरुड : लातूर तालुक्यातील मुरुड येथील पारूनगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एका रात्रीतून पाच ठिकाणी चोऱ्या करून दोन लाख किमतीचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिल्या घटनेत पंचायत समितीच्या माजी सदस्या जयश्री लक्ष्मीकांत तवले यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत कपाटातील चार तोळे सोन्याच्या दोन बांगड्या व कानातील एक तोळ्याचे झुमके असे एकूण पाच तोळे सोन्याचे दागिने तसेच पायातील चांदीची चैन व चांदीच्या समया असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्या घटनेत याच भागातील रामदास रखमाजी कांबळे यांच्या घराची ही कडी-कोयंडा तोडून दोन अंगठ्या व सात हजार रुपयांची रोकड व अंगणात लावलेली दुचाकी (एम.एच. २४ बी.सी. १७२०) असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच रोहित किराणा दुकान, मुरुड-बार्शी रोडवरील अनिल विश्वनाथ अंबेकर यांचे फर्निचरचे दुकान, शेखर नारकर यांचे शुभमंगल कापड दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. तसेच गुंज कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. याबाबत मुरुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नरवटे करीत आहेत.
वर्षभरात चोरीच्या घटनांत वाढ...गेल्या वर्षभरात मुरुडमध्ये चोरीचे प्रमाण वाढले असून, प्रत्येक महिन्याला चोरीच्या घटना घडत आहे. त्यामुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. मुरुड गावासह परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.