हरी मोकाशे, चाकूर (जि. लातूर) : येथील तहसील कचेरीच्या बाजूस असलेल्या महसूल कॉलनीतील प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरासह सहा जणांची घरे चाेरट्यांनी फोडल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यात प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या घरी चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. मात्र, उर्वरित काही ठिकाणी सोन्या- चांदीच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५४ हजारांचा ऐवज लंपास केला.
चाकुरातील तहसील कार्यालयाच्या बाजूस महसूल कॉलनी आहे. या कॉलनीतील तीन इमारतीत प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी राहतात. शनिवार, रविवारी सुट्टी असल्याने काही अधिकारी, कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ज्या इमारतीत नागरिक आहेत, त्या घरांना बाहेरुन कडी लावली. तसेच ज्या घरास कुलूप आहे, ते टॉमीच्या सहाय्याने तोडून आतमध्ये प्रवेश केला. तलाठी मुक्ता भुरकापल्ले यांच्या घरातील पाच तोळ्याच्या पाटल्या, चार तोळ्याची गळ्याची पट्टी, दीड तोळ्याचे मिनी गंठण, अडीच तोळ्याच्या दोन अंगठ्या, चांदीचे दागिणे व रोख २५ हजार रुपये तसेच विजय सोनकांबळे यांच्या घरातील दीड तोळ्याचे मिनी गंठण असा एकूण ४ लाख ५४ हजारांचा ऐवज लंपास केला. तसेच अन्य काही घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकले. याप्रकरणी रविवारी सायंकाळी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराला लावल्या बाहेरुन कड्या...
चोरट्यांनी ज्या घरात नागरिक आहेत, त्या घरांना बाहेरुन कड्या लावल्या होत्या. त्यामुळे रविवारी सकाळी दरवाजा उघडत नसल्याने काहींनी नजिकच्या नागरिकांना बोलावून कडी काढण्यास लावली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक साहेबराव नरवडे, पोउपनि. राजाभाऊ घाडगे, पोउपनि. कपिल पाटील, पोउपनि. तुकाराम फड तसेच तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना...
चाेरट्यांचा शोध घेण्यासाठी लातूरहून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. या पथकाने मुख्य रस्त्यापर्यंतचा माग दाखविला. तसेच ठसे तज्ज्ञांनी नमुने घेतले आहेत. दरम्यान, चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले.