लातूर : रेणापूर- उदगीर महामार्गावर असलेल्या १६०० वर्ष जुन्या राममंदिरात आज पहाटे चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात मंदिरा इतक्याच जुन्या १२ पंचाधातुंच्या मुर्त्या चोरीस गेल्या आहेत. रेणापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
रेणापूर शहरातील महामार्गालगत असलेले राम मंदिर हे जवळपास १५०० ते १६०० वर्ष जुने आहे. याच्या आजूबाजूला वस्ती दाट वस्ती असून मंदिरात जाण्यास केवळ एक अरुंद वाट आहे. तसेच याच्या आजूबाजूस पूजा-यांची १० घरेसुद्धा आहेत. येथील पुजारी बालाजी वैष्णव यांच्या माहितीनुसार, ते काल मध्यरात्री १.३० पर्यंत मंदिरातच होते. पहाटे दिनक्रमानुसार ते मंदिरात आले असता त्यांना मंदिरातील १२ पंचधातुंच्या मुर्त्या गायब झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी चोरीची माहिती त्वरित रेणापूर पोलिसांना दिली. मंदिरात सीसीटीव्ही नसल्याने चोरीबद्दल अधिक माहिती मिळणे कठीण झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अधिक श्वान पथकाच्या सहाय्याने अधिक तपास सुरु केला आहे. मात्र, श्वानपथकास कसलेही धागेदोरे आढळून आले नाहीत.
एक मूर्ती आहे २५ किलोची मंदिरातील राम व सीतेची मूर्ती पाषाणाची असून चोरी झालेल्या सर्व मुर्त्या पंचाधातुंच्या आहेत. यातील रामाची मूर्ती जवळपास २५ किलोची आहे. श्रीकृष्ण, लक्ष्मण, बालाजी, नरसींह यांच्यासह इतर मुर्त्याचे वजन प्रत्येकी १५ ते २० किलोच्या दरम्यान आहे.