रेणापूर (जि. लातूर) : पानगाव रस्त्यावरील घनसरगाव तांडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हा रस्ता तयार करून द्यावा यासाठी प्रहार संघटनेचे लातूर जिल्हा उपजिल्हाप्रमुख राजाभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली तळणी पाझर तलाव क्रमांक १ मध्ये अर्धे शरीर खड्यात पुरून अनोखे आंदोलन सकाळी दहा वाजल्यापासून सुरू आहे. तब्बल दोन तास झाले तरीही कुठल्याही प्रशासनाने या आंदोलनास भेट दिली नाही.
राष्ट्रीय महामार्ग ३६१ पानगाव रस्त्यापासून जाणारा अडीच किलोमीटरचा रस्ता हा घनसरगाव तांड्याला जातो या रस्त्यावरूनच तळणी पाझर तलाव क्रमांक-१ ची वाहतूक याच रस्त्यावरून आहे. गेल्या तीन वर्षापासून या तळ्यातून मोठ्या प्रमाणात मुरूम काढून नेला जात आहे. मुरूम वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. हा रस्ता दुरुस्त करून द्यावा यासाठी अनेक वेळा प्रहार संघटनेच्यावतीने संबंधित विभाग, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना सातत्याने निवेदन देण्यात आले. २६ जून रोजी रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या निवेदनानंतर सुद्धा कारवाई झाली नाही.
आज सकाळी १० वाजता रेणापूर तालुका प्रहार संघटनेच्यावतीने मुरूम खोदून नेलेल्या खड्ड्यात अर्धे शरीर पुरून घेत अनोखे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आंदोलनात तालुका अध्यक्ष अमोल गोडभरले, राजेश चौथवे, एकनाथ काळे, राजाभाऊ देशमुख, गोविंद खानापुरे, भानुदास दाणे, व्यकंट जाधव, खंडू वैध, बळीराम महानुरे व घनसरगाव तांडाचे गावकरी, शेतकरी यांचा सहभाग आहे. दरम्यान, अद्याप प्रशासनाकडून आंदोलन स्थळी कोणीच फिरकले नाही. जोपर्यंत ठोस व लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे प्रहार संघटनेचे उपजिल्हाप्रमुख राजाभाऊ राठोड यांनी सांगितले.