लातूर : भाजपा, काँग्रेसचे नात्या-गोत्यांचे राजकारण एकदाचे गाडून टाका, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लातुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर गुरुवारी आयोजित सभेत केली. ॲड. आंबेडकर म्हणाले, राज्यात १६९ कुटुंबांकडे सत्ता आहे. ते हाणून पाडण्याची वेळ आली आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी वंचित, बहुजन, भटके व अल्पसंख्याकांना किती स्थान दिले, याचे उत्तर द्यावे. यावेळी उमेदवार नरसिंग उदगीरकर, संतोष सूर्यवंशी, डी.एन. नरसिंगे, अण्णा जाधव, प्रा. राजेंद्र ढवळे, श्याम कांबळे उपस्थित होते.
ॲड. आंबेडकर काय म्हणाले?मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील आंदोलन करीत आहेत. काँग्रेस, भाजपाने किती गरीब मराठ्यांना उमेदवारी दिली, हे आधी सांगावे. भाजपा २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत आली तर गल्ली-गल्लीत गोध्रा, मणिपूर घडण्याची भीती आहे. मुस्लीम अल्पसंख्याक जेव्हा संकटात आले, तेव्हा तेव्हा वंचित आघाडीच पुढे आली.
भाजपा सरकार जुमलेबाजीचे आहे. खोटे बोलून फसविणाऱ्या सरकारला धडा शिकवा. ते पुन्हा सत्तेत आले तर देशाचे वाटोळे होईल. केंद्रातील सरकार हे ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स आणि तपास यंत्रणांचे आहे. लोकसभेच्या निकालानंतर अनेक काँग्रेस नेते भाजपाच्या घरी दिसतील. त्यात लातूर जिल्ह्यातील लोकही दिसतील, असे ॲड. आंबेडकर म्हणाले. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने सोयीचा उमेदवार दिला. त्यांच्या प्रमाणपत्राला न्यायालयात आव्हान दिले जात आहे. लातूरच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. उजनीच्या पाण्याबद्दल इथल्या राजकारण्यांनी सतत गाजर दाखविले.