लातूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यस्थापक शी. न. जगताप यांनी राज्यातील सर्वच बसचालकांची अल्को टेस्ट मशीनद्वारे एकाच वेळी तपासणी करण्याचे निर्देश राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले होते. त्यानुसार ३१ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजल्यापासून १ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या पथकांकडून अल्को टेस्ट तपासणी करण्यात आली. पाच आगारात मिळून दीड हजार चालकांची प्रस्तुत कालावधीत तपासणी झाली आहे. या तपासणीत एकाही चालकाने दारू पिल्याचे आढळले नाही. यामुळे लातूर विभाग गौरवास पात्र ठरला आहे.
लातूर विभागामध्ये एकूण नऊ पथकामार्फत अल्को टेस्ट तपासणी करण्यात आली. अहमदपूर, उदगीर, लातूर, निलंगा, औसा या आगाराचे प्रत्येकी एक पथक आणि फिरते तीन तसेच बसस्थानक क्रमांक दोनचे एक असे एकूण नऊ पथकांकडून तपासणी झाली. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रत्येक बसस्थानकात तसेच रस्त्यावर फिरत्या पथकांकडून गाडी उभी करून अल्को टेस्ट करण्यात आली. लातूर आगारात २१८ चालकांची तर उदगीर आगारात २७१ ड्युटी वरील चालकांची अल्को टेस्ट करण्यात आली. या तपासणीत एकाही चालकाने दारू पिल्याचे आढळले नाही. या चालकांना स्वतःबरोबर प्रवाशांची काळजी आहे, असेच यातून ध्वनीत होत आहे.
रात्री मुक्कामी असणाऱ्या चालकांवर होती नजर....राज्यातील अनेक विभागांमध्ये काही चालक मद्य प्राशन करून कामावर येत असल्याचे निदर्शनास आले होते. विशेषता रात्री मुक्कामासाठी जाणाऱ्या बस वरील चालकांबाबत हा प्रकार घडत असल्याचे तक्रारी होत्या. निदर्शनासही आले होते. त्यामुळे चालक कर्तव्यावर आल्यावर त्याची अल्को टेस्ट मशीनद्वारे तपासणी करणे गरजेचे वाटले. त्यामुळे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक शी. न. जगताप यांनी प्रस्तुत आदेश काढले होते. त्या आदेशानुसार लातूर विभागामध्ये दीड हजार चालकांची तपासणी करण्यात आली. सुदैवाने एकही चालक दारू पिल्याचा आढळला नाही. ही एक बाब गौरवाची ठरली आहे.
फिरत्या पथकाने गाडी थांबून रस्त्यात केली तपासणीरात्री मुक्कामी असलेल्या बसवर अधिक लक्ष करून अशा मार्गावरील गाड्यांना रस्त्यात उभे करून चालकांची तपासणी करण्यात आली. लातूर विभागात कोणत्या गाड्या कुठे मुक्कामी आहेत. याबाबतचे मार्ग फिरत्या पथकांनी अगोदरच ज्ञात केले होते. फिरत्या तीन पथकांनी नांदेड रोड, औसा, बार्शी रोड तसेच अंतर्गत ग्रामीण भागात मुक्कामी असणाऱ्या गाड्या लक्ष करण्यात आल्या होत्या. त्यानुसार या पथकांनी तपासणी केली. मात्र फिरत्या पथकालाही मद्यपी चालक आढळला नाही.