लातूर :एसटी आता सुसाट धावू लागली असून, खासगी प्रवासी वाहतुकीला ती मागे टाकत आहे. लातूर विभागात सरासरी दररोज १ लाख ८८ हजार नागरिक प्रवास करतात. प्रवाशांची एवढी मोठी संख्या एसटीच्या उत्पन्नात भर वाढविणारी असून, खासगी वाहतुकीला आळा घालणारी आहे. उन्हाळी सुट्या आणि सवलतीच्या योजनांमुळे एसटीने आता कात टाकली असून ती दिमाखाने प्रवाशांना घेऊन धावत आहे.
लातूर विभागामध्ये लातूर औसा निलंगा उदगीर अहमदपूर या पाच आजारांचा समावेश आहे. प्रत्येक आगारातून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूर आगारातून दैनंदिन ४२ हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. निलंग्यातून ३५ हजार, उदगीरमधून ४७ हजार, अहमदपूर ३८ आणि औसा आगारातून सरासरी २६ हजार प्रवासी दिवसाला प्रवास करत आहेत. ही आकडेवारी मे महिन्यातील असून गेल्या काही दिवसांपासून एसटीचा व्यवसाय वाढलेला आहे. वेगवेगळ्या योजना आणि काही सवलती यामुळे महामंडळाच्या बसने सद्य:स्थितीत खाजगी प्रवासी वाहतुकीला मागे टाकले आहे, असे म्हणण्याला वाव आहे.
मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी घेतले जात नाहीत...बसच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतले जात नाहीत. दुसऱ्या बसने येण्याचा सल्ला चालक- वाहकाकडून दिला जातो. ज्या मार्गावर अधिक प्रवासी आहेत. त्या मार्गावर जास्त गाड्या सोडण्याचे धोरण महामंडळाचे असल्याने खाजगी वाहतुकीप्रमाणे मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी घेतले जात नाहीत, असे विभागीय वाहतूक निरीक्षक अभय देशमुख यांनी सांगितले.
सेवेमुळे बसकडे ओढा वाढतोय...शिवशाही, लालपरी, स्लीपर, वातानुकूलित महामंडळाच्या गाड्या प्रवाशांच्या दिमतीला आहेत. आता बहुतांश नव्या गाड्या आहेत. बऱ्याच गाड्यांमध्ये मोबाइल चार्जिंगची सुद्धा सोय आहे. त्यात अनेक सुविधा आहेत. त्यामुळेही प्रवासी आकर्षिले जात आहेत. आधुनिक धोरण महामंडळाने स्वीकारल्यामुळे प्रवाशांचा ओढा आता खाजगीपेक्षा बसकडे वाढलेला आहे.
पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवासी...पुणे मार्गावर सध्या महामंडळाच्या बसला सर्वाधिक प्रवासी मिळत आहेत. लातूरमधून या मार्गावर जास्त प्रवासी आहेत. सध्या पंढरपूर यात्रेसाठी लातूर प्रशासनाने जादा बसची नियोजन केले आहे. यात्रेसाठी जवळपास १०२ बस तैनात होणार आहे. यात्रेसाठी सर्व योजना सर्व बससाठी लागू आहेत. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक अमृत योजना तसेच पाच सवलत योजना सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे एसटीचा धंदा सध्या तरी चांगला होत असल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.