लातूर : जिल्ह्यातील पाच आगारांपैकी अहमदपूर आणि औसा आगाराचे उत्पन्न कमी झाल्याने डिझेल पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे या दोन आगाराच्या एसटीची चाके जागेवरच रुतली आहेत. महामंडळाच्या पाचपैकी दोन पंपावरुन इंधन देणे बंद झाले आहे. यामुळे अनेक फेऱ्या बंद करण्याची नामुष्की महामंडळावर आली आहे.
जिल्ह्यातील पाच आगाराचे दैनंदिन उत्पन्न ३० ते ३२ लाख रुपये आहे. यापैकी दोन डेपोचे पैसे मुंबईला पाठवावे लागतात तर तीन डेपोचे पैसे स्थानिक खर्चासाठी ठेवले जातात. पाच डेपोतील बसेससाठी दररोज २८ हजार लिटर्स डिझेल लागते. या इंधनावर दिवसाला २५ लाख रुपयांचा खर्च होतो. तीन डेपोचे उत्पन्न २० ते २२ लाख रुपये असताना इंधनावर खर्च २५ लाखांचा आहे. त्यामुळे या दोन आगाराच्या बसेसचा डिझेल पुरवठा बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. कोरोनामुळे लांब पल्ला आणि अंतर्गत बसप्रवासी कमी झाले आहेत. त्यामुळे उत्पन्न घटले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत आहे. त्यामुळे डिझेल पुरवठा बंद करावा लागला आहे.
डिझेल दरवाढीचेही कारण...
जून २०२० मध्ये ६५ रुपये लिटर डिझेल होते. आता या महिन्यात ९५ रुपये लिटर डिझेलचा दर आहे. लातूर जिल्ह्यातील महामंडळाच्या ४५० बसेसपैकी सुरू असलेल्या ४१० बसेसला दररोज २८ हजार डिझेल लागते आहे. त्यासाठी २५ लाख दिवसाला मोजावे लागतात. गतर्षीपेक्षा ३५ टक्क्यांनी डिझेल दरवाढ आणि कोरोनामुळे प्रवासी कमी झाल्याने एसटी अडचणीत सापडली आहे. त्यातच एसटीने भाडेवाढ न केल्याचा फटकाही बसत आहे.
तीन हजार कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित...
महामंडळाचे जिल्ह्यात तीन हजार कर्मचारी आहेत. एसटीचे उत्पन्न कमी झाल्याने वेतनही अनियमित होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लातूर विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना संसार उसनवारीवर करावा लागत आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला हवी शासनाची मदत...
खाजगी वाहतुकीला पसंती न देता प्रवाशांनी महामंडळाच्या बसेसला पसंती दिली तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था रुळावर येईल. शिवाय, शासनानेही या महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची गरज आहे. खाजगी प्रवासी वाहतूक व्यवस्थेशी स्पर्धा करण्यासाठी सार्वजनिक व्यवस्थेला बळ देण्याची गरज असल्याची भावना एसटीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्यक्त केली.
अपेक्षित उत्पन्न नसल्यामुळे दोन आगाराचा डिझेल पुरवठा बंद झाला आहे. त्यांना अन्य डेपोमधून डिझेल पुरवठा केला जात आहे. परिस्थिती पूर्वपदावर येईल. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक