लातूर : एक राष्ट्र, एक निवडणूक यासाठी भाजप-आरएसएसने देशांमध्ये गोंधळ घातला होता. त्याला कायदेशीर अडचणही नव्हती. मात्र अनेक राज्यांमध्ये मुदतपूर्व निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे एकत्र निवडणुका घेण्याचा त्यांचा डाव फसला आहे. विशेष अधिवेशनात ३३ टक्के महिला आरक्षणाचे बिल पास करण्यात आले असले तरी २०३५ पर्यंत आरक्षण देणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महिलांना ३३ टक्के उमेदवारी देऊन आम्ही मनुस्मृतीप्रमाणे वागत नाहीत हे दाखवावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला केले आहे.
लातूर येथे सोमवारी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली. यापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजप, आरएसएस महिलांना समानतेची वागणूक देत नाही. वस्तू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मनुस्मृतीचीच वागणूक महिलांना भाजपने दिली आहे. पक्षात त्यांनी कधीच महिलांना ३३ टक्के उमेदवारी दिलेली नाही. आता ते स्वतःहून बदलत असतील तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत महिलांना ३३ टक्के उमेदवारी द्यावी. महिला आरक्षण लागू होईल तेव्हा होईल. मात्र उमेदवारी देऊन आम्ही बदललो आहोत, हे सिद्ध करावे. शिवसेना ठाकरे गटासोबत युती तसेच आघाडीत सामील होण्याच्या अनुषंगाने ॲड. आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकाही केली. पत्रपरिषदेला रेखाताई ठाकूर, संतोष सूर्यवंशी, सलीम सय्यद आदींची उपस्थिती होती.
हिंदू-मुस्लिम समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न....दिवाळीनंतरचा काळ कठीण आहे. हिंदू, मुस्लिम समाजामध्ये दुही निर्माण करून दंगली घडविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे गोध्रा आणि मणिपूर कांड पुन्हा घडणार नाही, यासाठी सामान्य जनतेने डोके भडकवू देऊ नये. हिंदू-मुस्लिम द्वेष भावना निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. दिवाळीनंतरचा काळ निवडणुकीचा आहे. त्यामुळे मुसलमानांना टार्गेट केले जाईल, तसे भाजपचे नियोजन सुरू असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला.
देशाच्या सत्तांतराच्यावेळी अराजकतेचा माहोल....सत्ता पालट होईल की नाही, हे निकालानंतर स्पष्ट होईल. पण या सत्तांतराच्या वेळी देशांमध्ये अराजकतेचा माहोल असेल, असे भाकीत करत आंबेडकर म्हणाले, देशातील पाच मंदिरे निवडणूक काळापर्यंत मिलिटरीच्या ताब्यात द्यावेत, असे आपण म्हटले होते. या विधानाचा गैर अर्थ काढण्यात आला. दरम्यान, शहरी नक्षलवाद आणि नक्षलवादाच्या नावाखाली अनेकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. ही एक प्रकारची अराजकता आहे.
मुस्लिम समाजाचा सामंजस्यपणा वाखाणण्याजोगा....ईद-ए-मिलाद हा सण गणेश विसर्जनाच्या दिवशी होता. मात्र मुस्लिम समाजाने सामंजस्यपणा दाखवून हा सण गणेश विसर्जन असल्याने दुसऱ्या दिवशी साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा सामंजस्यपणा वाखाणण्याजोगा आहे, असेही आंबेडकर म्हणाले.