किल्लारी (जि. लातूर) : पोलिस असल्याची बतावणी करून अज्ञातांनी एका वृद्ध जाेडप्याचे साडेसहा ताेळ्याचे साेन्याचे दागिने पळविल्याची घटना औसा तालुक्यातील किल्लारी येथील उमरगा महामार्गावर घडली. याबाबत किल्लारी पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील तपसे चिंचाेली येथील जयप्रकाश इराप्पा सेलूकर (वय ७०) आणि नवलाबाई सेलूकर हे शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून एकुरगा (ता. उमरगा जि. धाराशिव) येथे पाहुण्याकडे निघाले हाेते. दरम्यान, सिरसल पाटीनजीक पाठीमागून आलेल्या ३० ते ३५ वयाेगटातील अज्ञात दाेघांनी जाेर-जाेरात हाॅर्न वाजवत दुचाकी अडविली. त्यांनी सेलूकर दाम्पत्याला दरवाडवले. आम्ही पोलिस आहाेत, दुचाकी का थांबवत नाहीत, अशी विचारणा केली. इकडे चाेऱ्या-माऱ्या हाेत आहेत. तुमची तपासणी करायची आहे. सर्व साेने काढून बॅगमध्ये ठेवा म्हणून सांगितले. आम्ही घाबरून काही दगा-फटका हाेऊ नये म्हणून दागिने काढले. त्यानंतरही सर्वच दागिने काढा म्हणून जबरदस्ती केली. यात चार अंगठ्या, एक लाॅकेट, पाटली असे एकूण साडेसहा ताेळ्याचे साेन्याचे दागिने हाेते. त्यामध्ये एका हातातली पाटली निघाली नाही.
दरम्यान, त्यांनी बॅगमध्ये ठेवल्यासारखे करून ते दागिने घेऊन पसार झाले. ही घटना किल्लारी पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घडली. याबाबत किल्लारी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दाेघा अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.