लातूर - नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात लातूरकरांनी सोमवारी मोर्चा काढला. गंजगोलाई येथून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. अतीशय शांततापूर्ण वातावरणात निघालेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी रस्त्याच्या दुतर्फा तब्बल दीड हजार स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला उभे होते. संविधान जिंदाबाद, हमारी एकता जिंदाबाद, एनआरसी नको, रोजगार द्या असे फलक हाती घेऊन आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी एनआरसीसाठी कुठलेही कागदपत्रे सादर करणार नसल्याची शपथ घेण्यात आली. मोर्चाच्या समारोपप्रसंगी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
लातूरची सलोख्याची परंपरा कायम...शांतता, सामाजिक सलोखा व भाईचारा ही लातूरकरांची परंपरा आहे, ही परंपरा मोर्चात दिसून आली. मुख्य रस्त्याने निघालेला मोर्चा शांततेत मार्गक्रमण करीत असताना समोरून अनेक बसेस गेल्या. स्वयंसेवकांनी वाहनांना मार्ग काढून दिला. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठींबा दिला.