उदगीर (जि. लातूर) : संकटसमयी नागरिकांना तातडीने पोलिसांची मदत मिळावी, यासाठी डायल @ ११२ हेल्पलाइन देण्यात आली आहे. या क्रमांकावर संपर्क करून माहिती दिल्यास पाेलिस दहा मिनिटात घटनास्थळी दाखल हाेतात. सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका तरुणाने डायल @ ११२ या क्रमांकावर काॅल करून खोटी माहिती दिली. पाेलिसांनी चाैकशी केली असता, हा काॅल फसवा असल्याचे समाेर आले. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. गंमत म्हणून काॅल करणे तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे.
पोलिसांनी सांगितले, सोमवारी रात्री डायल @ ११२ या हेल्पलाइनवर गोंडराज यशवंत कांबळे याने काॅल केला. शिवशक्तीनगर परिसरात एका ठिकाणी चार ते पाच मुले दारू पिऊन विनाकारण गाेंधळ घालत आहेत. शिवाय, दगडफेक करून दहशत निर्माण करून लहान मुलांना त्रास देत आहेत, अशी माहिती पाेलिसांना दिली. या काॅलची उदगीर ग्रामीण ठाण्याच्या चार्ली पथकाने दखल घेत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांकडे चाैकशी केली असता, या भागात असा प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले. पाेलिसांनी ज्या माेबाइल क्रमांकावरून काॅल आला त्यावर पुन्हा काॅल केला. मात्र, त्याने पाेलिसांचा काॅल कट केला.
याबाबत पाेलिसांनी वरिष्ठांना कळविले. उदगीर ग्रामीण पोलिसांनी शोध घेत त्या तरुणाला पकडले. त्याला ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मीच काॅल करून तशी घटना घडलेली नसताना माहिती दिली. पोलिसांना त्रास द्यावा, या उद्देशानेच खाेटी माहिती दिल्याची कबुली दिली. याबाबत उदगीर ग्रामीण ठाण्यात मंगळवारी तरुणाविराेधात गुन्हा दाखल केला आहे.