लातूर : शहरातील खांडगावा राेड परिसरात बालविवाह हाेत असल्याची माहिती डायल ११२ वर मिळाली. या माहितीनंतर काही वेळात पाेलिस विवाह मंडपात दाखल झाल्याने सर्वत्र पळापळ सुरु झाली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रविवारी वरासह दाेन्ही बाजूचे नातेवाईक, पुराेहित, स्वयपांकी, वर्हाडी मंडळी आणि फाेटाेग्राफरविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील खाडगाव राेड परिसरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात आहे. याबाबतची माहिती पाेलिसांच्या डायल ११२ या हेल्पलाईनवर मिळाली. रविवारी पोलिसांनी तातडीने चाइल्ड लाईनच्यास पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. या माहितीवरुन पाेलिस ताफ्यासह विवाह मंडपात दाखल झाले. पोलिस आल्याचे पाहताच काही वऱ्हाडीमंडळी मंडपातून पसार झाले. पाेलिसांनी विवाह साेहळ्यातील मुला-मुलीच्या नातेवाईकाकडे चौकशी केली असता, वधू अल्पवयीन असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वधू-वरासह नातेवाईकांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. ही कारवाई महिला पोलिस उपनिरीक्षक लटपटे, अंमलदार चौगुले, कोतवाड, कांबळे, शेख, भरोसा सेल, दामिनी पथकाच्या अंमलदार पल्लवी चिलगर, चाईल्ड लाईनच्या पथकाने केली.
याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात ‘चाइल्ड लाईन’च्या अलका संमुखराव यांच्या तक्रारीवरून नवरा मुलगा, दोन्ही बाजूंचे नातेवाईक, लग्न जमविणारे, वधू-वराचे मामा, पुराेहित, फोटोग्राफर, स्वयंपाकी यांच्यासह एकूण १५० ते २०० वऱ्हाडी मंडळी यांच्याविराेधात रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.