लातूर : शहरासह जिल्ह्यात प्रारंभी किरायेदार म्हणून वास्तव्य करणाऱ्यांकडून मूळ घरमालकांना त्रास देण्याचे प्रकार समोर आले आहेत. हे वाद स्थानिक पोलीस ठाणे आणि त्यानंतर दिवाणी न्यायालयापर्यंत पोहोचले आहेत. किरायेदार म्हणून आले आणि घरमालक समजू लागले, अशी परिस्थिती काही ठिकाणी समोर आली आहे. लातूर शहरासह उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा या शहरांत मोठ्या प्रमाणात भाडेकरूंची संख्या आहे. विशेषत: लातूरमध्ये सर्वाधिक संख्या आहे. शिक्षण, नोकरी आणि रोजगारानिमित्त आलेली कुटुंब घर भाड्याने घेऊन वास्तव्याला आहेत.
घर भाड्याने देताना अशी घ्यावी काळजी
भाडेकरू ठेवत असताना घरमालकांनी करारपत्रक करावे. दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे.
दोन करारपत्रांमध्ये किमान एक महिन्याचे अंतर ठेवून करारपत्राचे नूतनीकरण करावे. यासाठी वकिलांचा सल्ला घ्यावा.
करारपत्रातील नोंदीनुसार नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, हे घरमालकांनी पाहण्याची गरज आहे.
१४५ प्रकरणे न्यायालयात
घरमालक आणि भाडेकरूंमधील वाद त्या-त्या दिवाणी न्यायालयात खटल्याच्या स्वरूपात सुरू आहेत.
भाडेकरूने विश्वास संपादन केल्याने घरमालक करारपत्र आणि नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यातूनच पुढे वाद टोकाला जातात.
लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा न्यायालयात असे जवळपास १४५ खटले सुनावणीसाठी दाखल आहेत.
लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दरवर्षी किमान २५ ते ३० तक्रारी घरमालकांकडून दाखल केल्या जातात.
ठाण्याच्या स्तरावर हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. टोकाचे वाद असतील तर हे प्रकरण दिवाणी न्यायालयात पोहोचते.
पोलिसांकडून पडताळणी करून घेण्याची गरज
एखादा भाडेकरू ठेवत असताना त्याची संबंधित पोलीस ठाण्याकडून पडताळणी करून घेण्याची गरज आहे. त्याच्याविरोधात काही गुन्हे दाखल आहेत का, याचीही खातरजमा केली पाहिजे. त्यानंतरच करारपत्र करावे. - निखिल पिंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, लातूर