शिरूर अनंतपाळ : घरणी मध्यम प्रकल्प यंदा शंभर टक्के भरल्याने रब्बी हंगामातील पिकांसाठी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांद्वारे कालवा सिंचन सुरू करावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतून होत होती. त्यामुळे पहिले आवर्तन सुरू करण्यात आले असून, दररोज २० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
घरणी मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यात ग्रीनबेल्ट निर्माण व्हावा म्हणून उजवा कालवा १७, तर डावा कालवा १९ किलोमीटर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शिवपूर, जोगाळा, लक्कड जवळगा, शिरूर अनंतपाळ, तळेगाव (दे.), साकोळ, सांगवी घुग्गी, कळमगाव, अजनी (बु.) यांसह अन्य गावांत कालवा सिंचन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना रब्बी पिके घेण्यासाठी मोठी मदत होत आहे. मागील दोन - तीन वर्षे घरणी मध्यम प्रकल्प भरला नव्हता. त्यामुळे कालवा सिंचन योजनेचा लाभ झाला नव्हता. परंतु यंदा परतीच्या पावसाने घरणी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने रब्बी हंगामासाठी कालवा सिंचन योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. कार्यकारी अभियंता ए. एन. मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कालवा सिंचन करण्याचे नियोजन करून दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
२४ किमी परिसरात लाभ...
घरणी मध्यम प्रकल्पाच्या दोन्ही बाजूंनी उजवा आणि डावा कालवा असल्याने तालुक्यातील काही गावांना लाभ झाला असून, २४ किमीच्या परिसरातील शेत-शिवार हिरवागार झाला आहे. कालवा सिंचन योजनेमुळे रब्बी हंगामाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
कालवा सिंचनद्वारे १४ दिवसांच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी उपअभियंता गोरख जाधव, राजेंद्र पांचाळ, एस. पी. केजकर, बी. एम. मोरे, मारुती बिरादार, बस्वराज बिराजदार, के. के. पाटील, गोविंद सुरवसे, जी. बी. मोरे, अंजना होळकर, जलदूत विठ्ठल शिंदे, संग्राम डोंगरे परिश्रम घेत आहेत.