वलांडी (जि. लातूर) : दारू विक्रीतून राज्याचे अर्थकारण मजबूत होत असेल, तर गांजा लागवडीमधून शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट होईल, यासाठी शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्या, अशा आशयाचे निवेदन लातूर जिल्ह्यातील धनेगाव (ता. देवणी) येथील जयंत पाटील या तरुण शेतकऱ्याने तहसीलदारांकडे शुक्रवारी दिले आहे.
धनेगाव येथील शेतकरी जयंत पाटील यांनी तहसीलदार सुरेश घोळवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. फिजीकल डिस्टन्स ठेवणे आवश्यक असताना दारू दुकानांसमोरील गर्दीने धोका वाढला आहे. दरम्यान, दारूला सवलत असेल तर गांजालाही परवानगी द्या, असे स्पष्ट करीत निवेदनात गांजाची उपयुक्तता नमूद केली आहे. गांजाची ओळख फार जुनी आहे. सोमरस आणि चिलीम ओढणे हे आपण पुराण कथांमधून ऐकत आलो आहोत. १९८५ पर्यंत भारतात गांजा सर्रास उघडपणे मिळत होता.
दरम्यान, कायद्याने त्याला बंदी आली. गांजाचे झाड अंबाडी वर्गातले असून, त्याच्यातून वाहणारा रस (डिंक) हा मादक आहे. गांजा हे मूळात एक औषधी झाड आहे. त्याचा निरनिराळ्या कामासाठी उपयोग होत आला आहे. मादी जातीच्या झाडापासून जो चिक निघतो त्याला गांजा म्हणतात. कोवळ्या फांद्यावर राळेसारखा जो थर येतो, त्याला चरस म्हणतात. तर पाने आणि टिकशा मिळून भांग तयार होते. गांजा हे वार्षिक पीक असून, स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण भागात तंबाखूसोबत गांजा तेवढाच दैनंदिन जीवनाचा भाग होता. असे नमूद करून पाटील यांनी परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे.
उत्तराखंड सरकारने २०१५ सालीच घेतला निर्णयउत्तराखंडच्या सरकारने २०१५ मध्ये गांजाची लागवड कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला. त्याचा उपयोग केवळ नशेसाठीच होतो असे नाही तर ते औषधातही उपयोगी आहे. त्यामुळे परवाना द्यावा, ज्याद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल. राज्याचे अर्थकारण आणि शेतकऱ्यांचेही अर्थकारण बळकट होईल. आत्महत्या थांबतील, असेही पाटील यांनी म्हटले आहे.