लातूर: चाकूर तालुक्यातील जढाळा येथील एकाने शेतात गांज्याची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी धाड टाकून ९.६८६ किलोग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा एकाविरुध्द किनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, गांजा वनस्पतीची लागवड करणे कायद्याने गुन्हा आहे. चाकूर तालुक्यातील जढाळा येथील आरोपी मीरासाब वजीरसाब शेख यांनी आपल्या गट क्र. १२८ मधील शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती किनगाव पोलिसांना मिळाली. त्यावरुन शनिवारी पोलिसांनी जढाळा शिवारात धाड टाकली. तेव्हा आरोपीने शेतात गांजाची १४३ झाडे लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही झाडे जप्त केली. हा गांजा ९.६८६ किलो ग्रॅम वजनाचा आहे. त्याची किंमत ६७ हजार ८०२ रुपये आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या फिर्यादीवरुन किनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउनि. जी.व्ही. तोटेवाड हे करीत आहेत.