राज्य शासनाने गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला विक्रीस प्रतिबंध घातला आहे. मात्र, या भागात अवैधरीत्या वाहतूक करून विक्री करण्यात येत आहे. सोमवारी रात्री दोघेजण कार (एमएच २५, आर ९५५५) मधून अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करीत होते. दरम्यान, सताळा गावानजीकच्या पुढील पुलाजवळ कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन उलटले. त्यात इस्माईल रफियौद्दीन तांबोळी (वय २९, रा. अहमदपूर) हा गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला.
या प्रकरणी पोहेकॉ. गंगाधर डोईजड यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात आरोपी असद रफियौद्दीनन तांबोळी व इस्माईल रफियौद्दीन तांबोळी (मयत) यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघातातील कारची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये असून ८१ हजारांचा गुटखा आहे. हे सर्व साहित्य ३ लाख ५३ हजार २०० रुपयांचे असून पोलिसांनी जप्त केले आहे. अधिक तपास सपोनि. शैलेश बंकवाड हे करीत आहेत.