राजकुमार जाेंधळे / औसा (जि. लातूर) : ओव्हरटेक करणाऱ्या कारने महावितरण साहित्याची वाहतूक करणाऱ्या थांबलेल्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीला पाठीमागून जाेराची धडक दिली. यात दाेघे जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना औसा-उमरगा महामार्गावरील फत्तेपूर पाटीनजीक शुक्रवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे.
अपघातातील मृतात दिनेश दंडगुले (वय ४७ रा. किल्लारी), सचिन कुसळकर (वय ३५ रा. माकणी ता. लोहारा) यांचा समावेश आहे. तर जखमीमध्ये यल्लपा पांढरे (वय ४५ रा. किल्लारी), मेघू सिंग (वय ५०), सुरज सिंग (वय २३ दोघेही रा. पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. जखमींला उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास महाविरणचे विद्युत साहित्य घेवून ट्रॅक्टर औशाकडून लामजन्याकडे जात होता. दरम्यान, फत्तेपुर पाटीनजीक हा ट्रॅक्टर रस्त्यालगत थांबला होता. त्यावेळी त्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एम.एच. २४ बी.आर. ५९२५) पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कार लांबवर जावून पडली. यामध्ये कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला असून, प्रवासी बाहेर फेकले गेले.
महामार्गावर विद्युत साहित्यही विखूरले...
अपघात एवढा भीषण हाेता की, कारचे तुकडे झाले असून, ट्रॅक्टरमधील विद्युत साहित्यही महामार्गावर विखुरले होते. घटनास्थळी वेळीच प्रवासी, युवक, पोलिसांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी तातडीने पाठविले. काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. पाेलिसांनी ती पूर्वत केली.