लातूर : जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे दरमहिन्याला कुटुंबातील प्रतिसदस्य पाच किलो अन्नधान्य देण्यात येत होते. मात्र, आता योजनेंतर्गत यापुढे दरवर्षी अन्नधान्याऐवजी प्रतिलाभार्थी १ हजार ८०० रुपये रोख रक्कम डीबीटीद्वारे देण्यात येणार असून, जिल्ह्यातील ५४ हजार २०५ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना तांदूळ तीन रुपये व गहू दोन रुपये प्रतिकिलो दराने वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. आता या केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी कुटुंबातील प्रतिलाभार्थी, प्रतिवर्षी एक हजार ८०० रुपये प्रमाणे रक्कम थेट दरमहा बँक खात्यात वितरीत केली जाणार आहे.
जिल्ह्यात केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंब संख्या ५४ हजार २०५ आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील ५ हजार ९८३, औसा ९ हजार ३५४, चाकूर ५ हजार ४०६, देवणी २ हजार ७२७, जळकोट १ हजार ७३०, लातूर ६ हजार ७४४, निलंगा १० हजार ९३८, रेणापूर ५ हजार ५५६, शिरूर अनंतपाळ २ हजार ९२१ आणि उदगीर तालुक्यातील २ हजार ८४६ शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे. जिल्ह्यातील जवळपास २ लाख ५५ हजार व्यक्तींच्या खात्यावर या योजनेतून रोख रक्कम जमा होणार आहे.