लातूर/ रेणापूर : मांजरा नदीपात्रातील पाण्यामध्ये लातूर शहरातील एका बावीस वर्षीय मुलीने उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील महापूर येथे घडली. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याची प्रक्रिया सुरु हाेती. मुलीचा मृतदेह शाेधण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर शहरातील पल्लवी प्रभाकर साबळे (२२, रा. खोरीगल्ली, लातूर) हिने लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील महापूर येथील मांजरा नदीच्या पुलावरुन शनिवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास वाहत्या पाण्यात उडी मारली. यावेळी ती पाण्यात वाहत गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, सहायक पोलीस निरीक्षक निर्मला क्रांती, अंमलादार बाळासाहेब कन्हेरी, साजीद शेख, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह अग्निशामक दलाचे जवान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, मयत पल्लवी साबळे हिचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत हाती लागला नव्हता. गत दोन दिवसांपासून मांजरा धरण १०० टक्के भरल्याने मांजरा नदीपात्रात धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मांजरा नदी दुथडी वाहत आहे. याच पाण्यात पल्लवी साबळे हिने शनिवारी रात्री महापूर येथील पुलावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु हाेती.