राजकुमार जाेंधळे / लातूर : चंदनाच्या झाडांची अवैधरित्या ताेड करून, साठवून ठेवण्यात आलेल्या १३०किलो चंदनासह, एक चारचाकी स्कार्पिओ वाहन असा एकूण ७ लाख ४० हजारांचा मद्देमाल पाेलिस पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथे साेमवारी केली. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथे पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओमधून चंदन वृक्षाच्या लाकडाची चाेरी करून, ती चाेरट्या मार्गाने विक्री केली जात असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. याप्रकरणी पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले. अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि प्रवीण राठोड, चंद्रकांत डांगे, नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, मोहन सुरवसे, तुराब पठाण यांच्या पथकाने अंबुलगा येथे सापळा लावला. अंबुलगा (बु.) येथे सचिन शिवदास माने हा घरासमोर वाहनात चंदनाचे लाकडे टाकून ते विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे स्थागुशाच्या पथकाने स्कार्पियोची (एम.एच. २४, ए.डब्ल्यू. ९३४०) तपासणी केली असता, त्यात चंदनाची साल काढून, तासलेला चंदनाचा गाभा, दोन पोती लाकडे आढळून आली. अधिक चाैकशी केली असता त्याने सचिन शिवदास माने (वय २९, रा. अंबुलगा) असे नाव सांगितले. विविध ठिकाणी त्याने ठेवलेले १३० किलो चंदन आणि स्कार्पिओ वाहन असा एकूण ७ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात सचिन शिवदास माने याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.