लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल इलिजिबिलिटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून विद्यार्थी-पालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केली असून, लातुरातील ते दाेन शिक्षक सध्या न्यायालयीन काेठडीत आहेत. साेमवारी रात्री उशिरा अटक केलेल्या गंगाधरसाेबत ‘त्या’ दाेघा शिक्षकांचा १६ लाखांचा व्यवहार झाल्याचा संशयही सीबीआयला आहे. गंगाधरच्या जप्त माेबाइलमधून फसवणुकीचे अनेक धक्कादायक खुलासे समाेर आले असून, याची चाैकशी केली जात आहे.
‘नीट’ प्रकरणात गुणवाढीचा संशय आल्याने नांदेड एटीएसने लातुरातील तिघांच्या घरावर छापा मारला हाेता. चाैकशी करून त्यांना साेडून देण्यात आले हाेते. दरम्यान, जप्त माेबाइलमधील चॅटिंग, विद्यार्थ्यांची बिहार राज्यातील प्रवेशपत्रे हाती लागल्यानंतर लातूर येथे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २३ जून राेजी रात्री चाैघांविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. प्रारंभी या गुन्ह्याचा तपास स्थानिक पाेलिसांनी केला. सध्या हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. सीबीआयने दाेघा शिक्षकांची काेठडी मागितली हाेती. या काेठडीत त्यांनी कसून चाैकशी केली. यातून लातुरातील फसवणुकीचा ‘म्हाेरक्या’ गंगाधरच असल्याचे आता समाेर आले आहे.
अन् गंगाधरचा बीपी वाढला...
मंगळवारी दुपारी बारा वाजता गंगाधरला लातूर न्यायालयात हजर करण्यासाठी सीबीआयचे पथक निघाले. यावेळी गंगाधरचा अचानक रक्तदाब वाढला.यावेळी त्याला तातडीने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लातुरातील शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डाॅक्टरांनी त्याची तपासणी केली. काही वेळानंतर रक्तदाब कमी झाला. त्यानंतर दुपारी ४ वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
शिक्षकांची झाली चॅटिंग...
मंगळवारी लातूर न्यायालयात सीबीआयच्या वतीने सांगण्यात आले, अटकेतील गंगाधर, पसार झालेला इरण्णा आणि दाेघा शिक्षकांची चॅटिंग, काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्याआधारे सीबीआय आता एक-एक धागा उकलण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थी-पालकांकडून लाखाे रुपये उकळल्याची माहिती आता समाेर आली आहे.
चाैकशीत दिशाभूल झाल्याचा संशय...
नीट प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दाेघा शिक्षकाची पोलिस, सीबीआयने कसून चाैकशी केली. यामध्ये गंगाधर हे नाव प्रारंभी समाेर आले. त्यानुसार दाखल गुन्ह्याच्या ‘एफआयआर’मध्येही गंगाधर (रा. दिल्ली) असा उल्लेख करण्यात आला आहे. चाैकशीमध्ये तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचा संशय सीबीआयच्या पथकाला आहे. याचाही तपास हाेणार आहे.