लातूर : ‘नीट-यूजी’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी लातुरात दाखल गुन्ह्यातील दिल्लीतील म्हाेरक्या गंगाधरला सीबीआयच्या पथकाने आंध्र प्रदेशातून अटक केली. सध्या ताे बंगळुरू येथे सीबीआय काेठडीत आहे, अशी माहिती सीबीआयकडून लातूर न्यायालयात शनिवारी देण्यात आली.
लातुरात गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने दाेघांना ताब्यात घेण्यात आले. चाैकशीत मध्यस्थ इरण्णा काेनगलवार व गंगाधरची नावे समाेर आली. त्यानंतर तपास यंत्रणा इरण्णा आणि गंगाधरच्या मागावर हाेती. गंगाधरला बंगळुरू येथील एका गुन्ह्यात सीबीआयने ताब्यात घेतले. त्याला बंगळुरू येथील न्यायालयाने सीबीआय काेठडी सुनावली आहे.
गंगाधरविराेधात देशभर गुन्ह्यांची नाेंद : लातूर न्यायालयात सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार गंगाधरविराेधात देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. लातूर येथील गुन्ह्यातही ताे दिल्लीतून सूत्रे हलवीत होता.
अनेक पालकांच्या सीबीआयकडे तक्रारी
‘नीट’ प्रकरणाची व्याप्ती विविध राज्यांत आहे. त्यानुसार अनेक पालक-विद्यार्थ्यांनी सीबीआयकडे स्वत: तक्रारी केल्या आहेत.
या प्रकरणाचा कसून तपास करण्यासाठी पसार झालेल्या आराेपींच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याचेही सीबीआयच्या वतीने सांगण्यात आले.
संजयच्या फोनमध्ये गंगाधरचा संबंध उघड
सीबीआयने पाच दिवस केलेल्या कसून चाैकशीत संजय जाधव याच्या माेबाइलमध्ये गंगाधरचा थेट संबंध उघड झाला आहे. त्यानुसार तपास सुरू आहे.
दहा जणांचे जबाब
लातुरातील गुन्ह्यात २८ जणांची यादी हाती लागली आहे. यांतील १० विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांची चाैकशी करण्यात आली असून, सीबीआयने दहा पालक-विद्यार्थ्यांचे जबाब नाेंदवले आहेत. यांतील इतरांची चाैकशी केली जाणार आहे.