लातूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेत लातूरच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची उर्वी भाऊराव यादव हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवून अव्वल स्थान मिळविले आहे. राज्य मंडळाप्रमाणेच सीबीएसईही गुणवत्ता यादी जाहीर करीत नाही. प्राप्त झालेल्या निकालांमध्ये उर्वीने ४९९ गुण (९९.८८ टक्के) मिळवून जिल्ह्यात सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डॉ.भाऊराव यादव व डॉ.स्नेहल यादव यांची मुलगी उर्वी हिने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक आणि आई-वडिलांना दिले आहे. तिने राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या एम्स बॅचला प्रवेश मिळविला असून, वैद्यकीय क्षेत्रात सेवा करण्याचा उर्वीचा मानस आहे. वडील शासकीय रुग्णालयात सेवा देतात. कोरोनाच्या काळात सर्व डॉक्टरांनी केलेल्या सेवेप्रती समाज कृतज्ञ आहे. आदर, सन्मान मिळणाऱ्या याच क्षेत्रात सेवा करण्याचा विचारही उर्वीने सांगितला.