जिल्ह्यात ३२१ जणांवर उपचार सुरू
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून सध्या ३२१ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १८० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाने आतापर्यंत ६७७ जणांचा बळी घेतला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने प्रयोगशाळेतील चाचण्या आणि रॅपिड अँटीजेन टेस्टवर अधिक भर दिला जात आहे. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी केली जात आहे.
मनपाच्या घंटागाडीचे नियोजन कोलमडले
लातूर : शहर महापालिकेच्या वतीने कचरा संकलनासाठी घंटागाड्या नेमण्यात आल्या आहेत. मात्र, काही प्रभागात नियमित कचरा उचलला जात नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे मोकळ्या प्लॉटवर, रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
गरुड चौक रस्त्यावर खड्डेच-खड्डे
लातूर : नवीन रेणापूर नाका ते नांदेडकडे जाणाऱ्या गरुड चौाकापर्यंत असलेल्या रोडवर खड्डेच-खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी स्थानिकांनी संबंधित विभागाकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
भाजीपाला बाजारात आवक वाढली
लातूर : शहरातील बाजारात भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. शेपू, मेथी, पालक, टोमॅटो, वांगी, मिरची, लसूण, गवार आदी भाज्यांची आवक होत असून, दरातही घट झाली आहे. जिल्ह्यात यंदा मुबलक प्रमाणात पाणी असल्याने भाजीपाल्यांची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. शहरातील रयतु बाजारात दररोज सकाळी ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक होत आहे.