कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमूळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अकरावी प्रवेश घेण्यासाठी कोणते निकष लावले जाणार याची चिंता आहे. लातूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. आवडीचे महाविद्यालय मिळावे यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची ऑफलाईन सीईटी परीक्षा घेण्याविषयी शिक्षण विभागाच्या वतीने चाचणपणी केली जात आहे. यातील गुणावरच अकरावीचे प्रवेश निश्चित करण्याचा मानस आहे. मात्र, मोठ्या संख्येने असणा-या विद्यार्थ्यांची सीईटी कोरोनाकाळात कशी घ्यायची असा प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण झाला आहे. त्यामूळे राज्यस्तरावर अकरावी प्रवेशासाठी काय निर्णय होतो याकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय...दहावीत मिळालेल्या गुणांवरच तंत्रनिकेतन, आयटीआयमध्ये प्रवेश मिळतो. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात येणार असला तरी तंत्रनिकेतन आणि आयटीआय प्रवेशासाठी कोणते निकष लावले जाणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
ऑफलाईन झाले तर कोरोनाचे काय...
ऑफलाईन सीईटी परीक्षा घेतली तर कोरोना रोखण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात पून्हा ऑफलाईन परीक्षा घेतली तर कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऑनलाईन सीईटी झाली तर ग्रामीण विद्यार्थ्यांचे काय...
कोराेनामूळे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान हाेणार आहे. त्यामुळे या परीक्षेला हजारो विद्यार्थी मूकतील. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. याचा विचारही शिक्षण विभागाला करावा लागणार आहे.
अंतर्गत मूल्यमापन कसे होणार...
दहावीतील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन अनेक शाळांमध्ये झालेले नाही. ऑनलाईन शिक्षण असले तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापन कसे करायचे याच्या मार्गदर्शक सुचनाच अनेक शाळांना मिळाल्या नसल्याचे शिक्षकांचे म्हणने आहे. मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतरच मुल्यमापन कसे करावे याबाबत संभ्रम दूर होईल.
लातूरातील प्राचार्य म्हणतात...
अकरावी प्रवेशासाठी सर्वसमावेश सीईटी परीक्षा घेणे आवश्यक आहे. या परीक्षेत सर्व विषयांच्या प्रश्नांचा समावेश असल्यास विद्यार्थ्याचे कौशल्य दिसून येईल. त्यामुळे शिक्षण विभागाने लवकरात लवकर अकरावी प्रवेशासाठीच्या मार्गदर्शक सुचना जाहीर करणे गरजेचे आहे. - प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, शाहू महाविद्यालय, लातूर
कोरोनामुळे वर्षभर शाळा सुरु होऊ शकल्या नाही. काही कालावधीसाठी ऑफलाईन वर्ग झालेत मात्र, वाढत्या प्रादूर्भावामूळे सदरील वर्ग बंद झाले. परीक्षा रद्दमूळे पालकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेेणे गरजेचे आहे. दहावीच्या परीक्षा रद्द् झाल्याने अंतर्गत मुल्यमापान कसे करणार हा प्रश्न आहे. - प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद कॉलेज, लातूर
जिल्ह्यात अकरावी प्रवेशाठी जागा - ३२०००
लातूर शहरात अकरावी प्रवेशाठी जागा - १४०००