अहमदपूर शहराच्या साैंदर्यात भर टाकणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चाैकात महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यातच शहरातील महामार्गाचे काम सुरू असून, स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील पुतळ्याभोवती अवैध प्रवासी वाहतूक करणारे जीप, ऑटो, टमटम आणि छोटा हत्ती आदी जवळपास शंभर वाहनांचा पुतळ्याला दिवसभर गराडा असताे. त्याचबराेबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूस आणि समोर सायंकाळी हातगाडीवाले, पुतळ्याच्या गेटसमोर थांबवतात. परिणामी, पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण होत आहे. याबाबत पुतळा समिती आणि नगर परिषदेने दोन व्यक्तींची नेमणूक केली आहे. तरीही अतिक्रमण कायम आहे. शहरात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आझाद चौक हा एकमेव मार्ग असल्याने तेथे वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. याबाबत नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, अतिक्रमण काढण्याबाबत काेणतीही कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले.
अवैध वाहनांचा त्रास...
स्वातंत्र्यवीर सावरकर चाैकात थांबणाऱ्या वाहनांचा स्थानिक नागरिकांसह तहसील कार्यालयात ये- जा करणाऱ्यांना माेठा त्रास हाेत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर चाैकात किनगाव, परचंडा, राेकडा वावरगाव आणि अंबाजाेगाईकडे जाणारी वाहने दिवसभर थांबतात. याबाबत पाेलीस निरीक्षकांना सूचना देऊनही सदरील अतिक्रमण हटविण्यात आले नाही, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले.
सतत हाेतेय वाहतूक काेंडी...
अहमदपूर शहराचा वाहतुकीचा भार एका पाेलीस कर्मचारी आणि दाेन होमगार्ड्सवर आहे. शहरातून दाेन राष्ट्रीय महामार्ग जातात. सतत हाेणाऱ्या वाहतूक काेंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखेची गरज आहे. त्याचबराेबर सिग्नल व्यवस्थाही नाही. यातून सततची वाहतूक काेंडी हाेत आहे, असे बसवराज इरफळे म्हणाले.