चाकूर (जि.लातूर) : चाकूर तालुक्यातील आनंदवाडी शिवारातील दोन फार्म हाऊसवर सहाय्यक पोलिस अधिक्षक यांच्या पथकाने छापा टाकून ६ क्विंटल १० किलो चंदनाची लाकडे, दोन कार असा ३७ लाख रुपयाचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री करण्यात आली.
आनंदवाडी शिवारात बुंदराळे यांचे फार्म हाऊस आहे. या ठिकाणाहून चंदनाची साठवणूक करून वाहतूक केली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक कदम, पोलिस निरिक्षक बालाजी मोहिते, पोलिस उपनिरिक्षक अभंग माने, कपील पाटील, पोहेकॉ सिराज शेख, पाराजी पुट्टेवाड, सूर्यकांत कलमे, हणमंत मस्के यांनी सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास आनंदवाडी शिवारातील रामदास बुंदराळे यांच्या फार्म हाऊसवर छापा मारला. यावेळी तेथील एका खोलीत जमीनीखाली हौद आढळून आला. त्या हौदात चंदनाचे लाकडी गाभा असलेले बारा पोते आढळून आले. समोर जीप (एम.एच.४३ ए.के. ७६१०) ही उभी होती. पोलिसांनी जीपची झडती घेतली असता त्यात ६ पोते चंदनाची लाकडे होते त्याचे वजन ४०० किलो असून त्याची अंदाजे किंमत १० लाख रुपये तर जीप ११ लाख रुपयाची असा या पोलिस पथकाने २१ लाख रुपयाचा ऐवज जप्त केला.
जमिनीत केले चंदनासाठी हौद...
नरसिंग बुदराळे यांच्या फार्म हाऊसवरही पोलिसांनी धाड घातली. तेथील खोलीत जमीनीखालच्या हौदातून सात पोत्यात चंदनाची लाकडे गाभा असलेली आढळून आली. तर समोर उभी असलेली जीप (एमएच.१२ जी.के. ४९९९) याची झडती पोलिसांनी घेतली. त्यात ५ पोत्यातून चंदनाची लाकडे त्याची किंमत ५ लाख रुपये आणि जीप ११ लाख रुपयाची असा १६ लाख रुपयाचा एेवज जप्त केला. दोन धाडीतील ६१० किलो चंदन लाकडे दोन जीप असा ३७ लाख रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी नरसिंग बुदराळे, नितीन बुंदराळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस निरिक्षक मोहिते यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरार्यंत सुरू होती.