लातूर : मराठवाड्यामध्ये दुष्काळाची दाहकता भीषण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा. केंद्रानेसुद्धा मराठवाड्यातील दुष्काळासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले त्याची अंमलबजावणी भाजप सरकारने करावी असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
लातूर जिल्ह्यातील बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी मंचावर सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते विश्वनाथ नेरुरकर, संपर्क नेते खा.चंद्रकांत खैरे, खा.रवींद्र गायकवाड, सहसंपर्क प्रमुख अभय साळुंखे, जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी आदींची उपस्थिती होती.
दुष्काळ जाहीर करावा
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठवाड्यातल्या दुष्काळाची दाहकता भीषण आहे. सुरुवातीच्या पावसांनंतर येथे पाऊसच झालेला नाही. सरकारच्या वतीने फक्त मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळकाढू धोरण न राबविता मराठवाड्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा.
राम मंदिर कधी बांधणार तारीख जाहीर करा...निवडणुकीमध्ये राम मंदिर उभारण्याचे भाजप सरकारने आश्वासन दिले होते पण तो एक जुमला होता. राम मंदिर बांधणार तर कधी त्याची तारीख जाहीर करा. २५ नोव्हेंबर ला अयोध्येत जाणार असून भाजपला त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.