औसा (जि. लातूर) : श्रीसंत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा पराभव झाला. आ. अमित देशमुख यांच्या पॅनलमधील १६ उमेदवारांनी सर्व जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला.ही निवडणूक काँग्रेस व भाजपाने प्रतिष्ठेची बनविली होती. भाजपाचे मंत्री, पदाधिकारी, लातूरचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य प्रचारात होते. तसेच मांजरा, विकास, रेणा, जागृती कारखाने ताब्यात असलेल्या देशमुख परिवारानेही या निवडणुकीत जोरदार टक्कर देत भाजपाच्या पॅनलला रोखले. विशेष म्हणजे हा साखर कारखाना बंद स्थितीत आहे. दोन्ही पॅनलकडून तो चालू करून शेतकऱ्यांचे हित जपणार असल्याचा दावा केला होता. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांनी पॅनल उभे केले होते. भविष्यातील विधानसभेच्या चाचपणीच्या दृष्टीने पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरले. परंतु, त्यांना कारखाना निवडणुकीत यश आले नाही. या निवडणुकीत ५ हजार ९७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचे पॅनल पराभूत; काँग्रेसचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 4:53 AM