लातूर - आमदार बच्चू कडू यांच्या कामाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. तसेच अपंग, गरीब, गरजू आणि वंचितांसाठी लढणार नेता, आमदार म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. आता, लातूरमध्ये एका कुटुंबाला घर बांधून दिल्यामुळे पुन्हा एकदा बच्चू कडू सामन्यांसाठी हिरो ठरले आहेत. विशेष म्हणजे गतवर्षी मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत या पीडित कुटुंबाचे घर पडले होते.
लातूर जिल्ह्याच्या निलंगा येथील भारत कांबळे यांच्या घराची मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत पडझड झाली होती. राज्य सरकारला या घटनेचा विसरही पडला. मात्र, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेकडून पीडित भारत कांबळे यांना हे पडझड झालेलं घर बांधून देण्यात आलं. विशेष म्हणजे घराचा ताबा देताना खुद्द बच्चू कडू हजर राहिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 मे 2017 रोजी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. ते निलंगा येथील कार्यक्रम आटोपून परतत असताना खराब वातावरणामुळे त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. सुदैवाने फडणवीस यांच्यासह हेलिकॉप्टरमधील इतर सुखरूप बाहेर पडले. मात्र, या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निलंग्यातील भारत कांबळे यांच्या घराची पडझड झाली होती. याकडे सरकार अन् प्रशासनाने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं. मात्र, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे घर बांधून भारत कांबळे यांना त्यांच्या घराचा ताबा दिला. दीड वर्षानंतर हक्काच घरं उभारलेल्या कांबळेंच घर पाहण्यासाठी अन् या गृहसोहळ्यासाठी बच्चू कडू स्वत: उपस्थित राहिले होते.