१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा कायद्याने विवाह करता येत नाही. परंतु, अज्ञान किंवा अन्य कारणांमुळे बालविवाह होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकूण विवाहांच्या तुलनेत ३० टक्के विवाह बालविवाह असतात, असा अनुभव बाल हक्क अभियानाचे राज्य कार्यक्रम प्रमुख बी.पी. सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्हा बाल संरक्षण समितीच्या सहकार्याने जिल्ह्यात वर्षभराव ३० विवाह रोखण्यात आल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.
गावस्तरावर ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी
गावस्तरावर ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शिवाय, प्रत्येक गावात बालसंरक्षक समिती सरपंचाच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. तरीही जिल्ह्यामध्ये बालविवाह होण्याचे प्रमाण आहे. बालविवाह होऊ नयेत म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तसेच अन्य संस्थांकडून प्रबोधन आणि कायद्याबाबत जनजागृती केली जात असली तरी बालविवाहाच्या घटना होताना दिसत आहेत.
जिल्हा बाल संरक्षण विभागाने १७ विवाह रोखले
लाॅकडाऊन काळातील जून महिन्यात ४, जुलै महिन्यात ३, ऑगस्ट महिन्यात २, सप्टेंबर महिन्यात २, तर डिसेंबर महिन्यात ५ असे एकूण १७ बालविवाह रोखण्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालयाला यश आले असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे यांनी सांगितले. एका बालविवाह प्रकरणात गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने गेल्या वर्षभरात ३० बालविवाह रोखले असल्याचे चाईल्ड लाईनचे म्हणणे आहे.
लाॅकडाऊन काळामध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढलेले आहे. परंतु, जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या वतीने याबाबत जनजागृती आणि कारवाई केली जाते. वर्षभरात आम्ही १७ बालविवाह रोखले आहेत. एका प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. प्रत्येक गावात बालसंरक्षण समिती आहे.
-धम्मानंद कांबळे, बालसंरक्षण अधिकारी