लातूर : जन्मदात्या आई- वडिलांचा सांभाळ न केल्यास मुलांना, सुनेस वारसा हक्क न देण्याचा ठराव येरोळ (ता. शिरुर अनंतपाळ) येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला आहे. या निर्णयाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त येरोळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सुकुमार लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी उपसरपंच सतीश सिंदाळकर, कृषी सहाय्यक एम.ओ. मोदी, पशू चिकित्सालयाचे डॉ. गोरे, ग्रामविकास अधिकारी केशव माडीबोयणे, प्रभाकर बरदाळे, नामदेव सिंदाळकर, नंदकुमार साकोळकर, राजेंद्र सिंदाळकर, अमर माडजे, मच्छिंद्र भालेकर, सुरेश लोंढे, किसन पिचारे, एल.जी. लोंढे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी केशव माडीबोयणे यांनी मागील इतिवृत्त वाचून दाखविले.
त्यानंतर गावातील मुख्य रस्ता व चौकातील अतिक्रमण हटविणे, लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करुन देणे, समाज मंदीर बांधणे, गावास पाणी पुरवठा, पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करणे, गावातील अवैध दारुविक्री बंद करणे अशा विषयांवर चर्चा करण्यात आली आणि निर्णय घेण्यात आले. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी गावात रहावे, असा ठराव घेण्यात आला.
टाळ्यांच्या गजरात सहमती...ग्रामसभेत वृध्द आई- वडिलांचा मुले, सूना सांभाळ करीत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तेव्हा जी मुले, सूना आपले आई- वडिल, सासू- सासऱ्याचा सांभाळ करीत नाहीत, त्यांना शासकीय योजनांचा लाभ द्यायचा नाही, अशी चर्चा करण्यात आली. तसेच आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांचा ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर वारसा हक्काने नोंद न घेण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात निर्णयास सहमती दर्शविली.