लातूर : विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३० गुणवंत विद्यार्थ्यांची थुंबा येथील भारतीय अंतराळ संशोधन केंद्रास भेट देण्यासाठी लातूरची टीम मंगळवारी सकाळी रवाना झाली. १६ ते २० मे या कालावधीतील शैक्षणिक सहलीसाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, डायटच्या प्राचार्या डॉ. भागीरथी गिरी यांनी झेंडा दाखवून सहल त्रिवेंद्रमकडे रवाना केली.
इस्रो भेटीसाठी केंद्र, तालुका व जिल्हा अशा तीन पातळ्यांवर परीक्षामधून निवड झालेल्या ३० गुणवंत विद्यार्थ्यांना या हवाई सफरीसाठी निवडण्यात आले. या शैक्षणिक सहलीचे नेतृत्व प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे या करत असून, त्यांच्या समवेत जिल्ह्यातून ३० विद्यार्थी व १० अधिकारी, शिक्षक यांची टीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था, थुंबा व इतर आठ शैक्षणिक स्थळांना भेट देवून उपग्रह प्रक्षेपनाचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची जवळून ओळख व्हावी, शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार लागावा, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर संशोधन प्रक्रियेची माहिती मिळावी या हेतूने या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही हवाई सफर एक पर्वणीच ठरणार आहे.
या ठिकाणांना भेटी देणार..सहली दरम्यान विद्यार्थी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, थुंबा, केरला सायन्स सेंटर, पद्मनाभ स्वामी टेंपल, कोवलम बीच, लाईटहाऊस, बॉटनीकल गार्डन, प्राणीसंग्रहालय, एअरक्रॉफ्ट संग्रहालय, बिर्ला सायन्स सेंटर, गोवळकोंडा किल्ला आदी शैक्षणिक व वैज्ञानिक स्थळांना भेट देणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा ब्लेझर, शूजसह हवाई सफरीचा खर्च लातूर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून केला जात आहे.