औसा (जि. लातूर) : जेवण तयार करण्यासाठी रस्त्यालगत ट्रकचालकाने ट्रक थांबविला असता, ट्रकमधील २४ लाखांची बिडी अज्ञातांनी पळविली. ही घटना लातूर जिल्ह्यातील औसा-लामजना महामार्गावर ८ ऑक्टाेबर राेजी रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, ट्रकचालक साहेबराव माेहन हिवराळे (वय ३५ रा. शिंगणापूर, ता. उमरी, जि. नांदेड) यांनी आपल्या ताब्यातील ट्रक (टी.एस. १७ टी. ८९६८) जेवण तयार करण्यासाठी ८ ऑक्टाेबर राेजी रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास लातूर-बीदर महामार्गावरील औसा-लामजनादरम्यान रस्त्यालगत थांबविला हाेता. यावेळी अज्ञातांनी माेठ्या शिताफीने ट्रकमधील बीडीचे १२ ते १३ किलाे वजनाचे एक पाेते असे एकूण १३० पाेते असा एकूण २३ लाख ७३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना औसा ते लामजना महामार्गावरील एका पेट्राेल पंपासमाेर घडली. याबाबत औसा पाेलीस ठाण्यात अज्ञातांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस निरीक्षक एस. यू. पटवारी करत आहेत.