राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कडक नियम केले आहेत. विनामास्क फिरणा-यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर, मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या तालुक्यात कोरोनाचे १४ पॉझिटिव्ह आहेत. तालुक्यातील आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १ हजार १४३ वर पोहोचली आहे. त्यात उपचार करून १ हजार ८९ जणांना घरी पाठविण्यात आले आहेत.
मध्यंतरीच्या काळात तालुक्यात कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे शहरासह तालुक्यातील बहुतांश नागरिक विनामास्क फिरु लागले. फिजिकल डिस्टन्सिंगकडेही दुर्लक्ष करण्यात येऊ लागले. दरम्यान, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या आदेशानुसार सोमवारी नगरपंचायतीच्या वतीने विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई सुरु केली. मात्र, ती फार वेळ सुरु राहिली नसल्याचे दिसून आले.
नियमांचे पालन करावे...
प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा. ताप, खोकला, दम असा त्रास जाणवत असल्यास नजिकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख म्हणाले.