औसा (जि. लातूर) : दुष्काळ अन् सततची नापिकी त्याचबरोबर परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने पित्याकडे शिक्षणाचा खर्च उचलण्याची क्षमता नसल्याच्या कारणावरून आर्थिक विवंचनेत अडकलेल्या बारावीतील श्रीधर श्रीकृष्ण पाटील या विद्यार्थ्याने औसा येथे बुधवारी दुपारी राहत्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील बोरगाव (न.) येथील शेतकरी श्रीकृष्ण पाटील हे ऑटो चालक आहेत. त्यांना बोरगाव शिवारात दीड एकर शेतजमीन असून, मुलगा श्रीधर हा औसा येथील एका महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. दरम्यान, शिक्षणासाठी लागणा-या पैशाची तडजोड पित्याकडून होत नसल्याने श्रीधर पाटील हा आर्थिक विवंचनेत होता. दिवाळीच्या सुटीनिमित्त तो गावाकडेही गेला होता. पित्याकडे शिक्षणाचा खर्च, परीक्षा शुल्क, खासगी शिकवणीचे शुल्क आणि रूम भाड्यापोटी पैशाची मागणी केली होती.दरम्यान, पित्याकडे शैक्षणिक खर्चाचा भार उचलण्याची क्षमता राहिली नव्हती. दुष्काळ, सततची नापिकी अन् परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यावेळी पित्याने शिक्षणासाठी आपल्याकडे पैसे नाहीत, शिक्षणाचा खर्च उचलणे आता शक्य नसल्याचे सांगितले. यावेळी हताश झालेल्या श्रीधर पाटील या विद्यार्थ्याला पुढील शिक्षणाची समस्या भेडसावत होती. वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती तर शेतीत असलेले पीकही पावसामुळे संपुष्टात आले होते.दिवाळीची सुटी संपल्यानंतर श्रीधर हा औसा येथील हाशमी नगरमध्ये असलेल्या खोलीवर दाखल झाला. गावाकडून आल्यापासून त्याला शिक्षणाची चिंता सतावत होती. पित्यावर भार होऊ नये म्हणून त्याने बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या खोलीवर गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. याबाबत औसा पोलीस ठाण्यात दिलेल्या कुटुंबीयाच्या माहितीवरून नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा बोरगाव या गावी मृत श्रीधर पाटील याच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
औशात बारावीच्या विद्यार्थ्याची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 10:42 PM