लातूर / उदगीर : तहसील कार्यालयातील सहायक लिपिक लाच स्वीकाराताना एसीबीच्या सापळ्यात दुसऱ्यांदा अडकल्याची घटना शुक्रवारी उदगीर येथे घडली. जामिनासाठी लागणाऱ्या साॅलव्हन्सी (ऐपतदार) प्रमाणपत्राच्या कामासाठी दाेन हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उदगीर तहसील कार्यालयात कार्यरत असलेला सहायक लिपिक प्रशांत अंबादासराव चव्हाण (वय ४८) याच्याकडे तक्रारदाराने साॅलव्हन्सी प्रमाणपत्रासाठी रीतसर अर्ज केला हाेता. तक्रारदाराच्या भावजीवर गुन्हा दाखल असल्याने त्याच्या जामिनासाठी हे प्रमाणपत्र लागणार आहे. यासाठी वडिलांच्या नावे हे प्रमाणपत्र हवे हाेते. या कामासाठी दाेन हजारांच्या लाचेची मागणी केली. याबाबत लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार दाखल केली.
या तक्रारीची शहानिशा करून एसीबीच्या पथकाने तहसील कार्यालयातील महसूल विभाग परिसरात शुक्रवारी सापळा लावला. दरम्यान, पंचासमक्ष तक्रारदाराकडून दाेन हजारांची लाच स्वीकारताना लिपिक प्रशांत चव्हाण याला पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई नांदेड येथील एसीबीचे अधीक्षक डाॅ. राजकुमार शिंदे, अपर पाेलीस अधीक्षक धरमसिंग चव्हाण, पाेलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक अन्वर मुजावर, भास्कर पुल्ली यांच्या पथकाने केली.
२०१६ चे लाच प्रकरण न्यायप्रविष्ठ...
उदगीर तहसीलमधील लिपिक प्रशांत चव्हाण हा शुक्रवारी दुसऱ्यांदा लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. २०१६ मध्ये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला पकडले हाेते. त्याच्या विराेधातील प्रकरण न्यायालयात सुरू आहे. दरम्यानच्या काळात ताे पुन्हा सेवेत रुजू झाला आणि पुन्हा दुसऱ्यांदा लाच स्वीकारताना अडकला.