लातूर : रोहिणी नक्षत्रासह मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा हवालदिल झाला असून, पेरण्या कधी होतील याची चिंता पडली आहे. दरम्यान, रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरी २१ जूनपासून निघणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात चांगला पाऊस असल्याचा दावा पंचांग अभ्यासकांनी केला आहे. परिणामी, या नक्षत्राच्या पावसावर पेरण्या होतील, अशी अपेक्षा आहे.
मृग नक्षत्र २१ जून रोजी संपत आहे. २२ जूनपासून आर्द्रा निघत आहे. ६ जुलैपर्यंत हे नक्षत्र राहणार आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीत चांगला पाऊस होईल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या पावसावरच पेरण्या होतील. कारण त्यापुढे निघणारे नक्षत्र पुनर्वसू आहे. या नक्षत्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. ६ जुलै ते २० जुलैपर्यंत असणाऱ्या पुनर्वसू नक्षत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. पेरण्यानंतर अशाच पावसाची गरज असते. तो पाऊस या नक्षत्रात पडणार आहे, असेही पंचांग अभ्यासक आनंद तिवारी यांनी सांगितले.
२० जुलैनंतर पुष्य नक्षत्र निघते. या नक्षत्रातही चांगला पाऊस असून, ३ ऑगस्टपर्यंत या नक्षत्राचा कालावधी आहे. मोठा पाऊस या नक्षत्रात अपेक्षित आहे. पंचांगकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आर्द्रा, पुष्य आणि आश्लेषा हे तीन नक्षत्र मोठे नक्षत्र असून, चांगला पाऊस या तिन्ही नक्षत्रात आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पुनर्वसू नक्षत्रात आहे. पहिले दोन कोरडे, त्यानंतरच्या आर्द्रा नक्षत्र जोरदार पाऊस होणार असून, पुनर्वसू नक्षत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि त्यानंतर निघणाऱ्या पुष्य आणि आश्लेषा नक्षत्रात जोरदार पाऊस असल्याचे पंचांग अभ्यासक तिवारी यांनी सांगितले.
आर्द्रा, पुष्य आणि आश्लेषा नक्षत्रात मोठा पाऊसपुष्य आणि आश्लेषा नक्षत्राचा कालावधी जुलै महिन्यात आहे. या महिन्यात मोठा पाऊस होईल, अशी अपेक्षा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्यातही बऱ्यापैकी पावसाचा अंदाज असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जुलै महिन्यात पेरण्या होऊन खरिपाची पिके जोमात येऊ शकतात.
चिंतेचे काही कारण नाहीरोहिण्या आणि मृग नक्षत्र कोरडे गेले असले तरी चिंता करण्याचे कारण नाही. जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस आहे. एक नक्षत्रवगळता सगळ्या नक्षत्रात चांगला पाऊस आहे. पुनर्वसू नक्षत्रातही मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्यामुळे चिंतेचे काही कारण नाही. ढग दाटून येतील आणि कोसळतीलही.- आनंद तिवारी, पंचांग अभ्यासक