येरोळ (लातूर) : मागील आठवड्यात अवकाळी पाऊस व सततचे ढगाळ वातावरण व पहाटेच्यावेळी पडत असलेल्या धुक्याने हरभऱ्याचे पीक जळून गेले. त्यामुळे हाती काहीच येणार नसल्याने येरोळ येथील दोन युवा शेतकऱ्यांनी दोन हेक्टर क्षेत्रात पेरलेल्या हरभरा पिकावर रोटाव्हेटर फिरवून शेतच मोकळे केले.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील ओमकार नामदेव सिंदाळकर यांनी गट नंबर २० मध्ये एक हेक्टरवर हरभरा पेरला होता. तर योगेश तांबोळकर यांनी गट नंबर २३४ मध्ये तीन एक्करवर सव्वा महिन्यापुर्वी हरभरा पिकाची पेरणी केली होती. पेरणी, खत बि-बियाणे, औषध फवारणीसाठी ५० हजार रुपये खर्च करुनही पडलेल्या अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व पहाटे पडत असलेल्या धुक्यामुळे हरभरा जळुन गेल्याच्या निराशेतुन या दोन युवा शेतकऱ्यांनी चक्क हरभरा पिकावर रोटाव्हेटर फिरविला आहे.
ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकावर महागडे किटकनाशक, औषध फवारणी करुनही अळी मरत नाही तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकावर रोटाव्हेटर फिरवून शेतच मोकळे केले. या नुकसानापोटी प्रशासनाने शासनाकडून त्वरीत आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.