पुरुष नसबंदीचा कोणताही धोका नाही. त्याचे पुरुषांच्या शरीरावर कोणतेही परिणाम होत नाहीत, याबाबत वैद्यकीय आधार असतानाही पुरुष मंडळींची मानसिकता बदलत नसल्याचे चित्र समाेर आले आहे. परिणामी, शासनाच्या उपक्रमास थंडा प्रतिसाद मिळत आहे. नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या दाम्पत्यांना नसबंदीविषयी माहिती दिली जाते. मात्र पुरुष नसबंदीसाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या वतीने पुरुष नसबंदी
करणाऱ्या लाभार्थ्यांना १ हजार १०० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.
केवळ महिलाच नव्हे, तर
पुरुषांनीही कुटुंब नियोजनासाठी
पुढाकार घ्यावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रबोधन केले जात आहे. याला पुरुषांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समाेर आले आहे. उलट या वर्षभरात ६१७ महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. यंदा कोरोनामुळे परिणाम झाला आहे. कोरोनाचा परिणाम असला तरी पुरुष नसबंदीला सातत्याने अल्प प्रतिसाद मिळत आहे. पुरुष नसबंदीबाबत वेळोवेळी जनजागृतीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
मानसिकता बदलणार कधी?
पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास त्याची कार्यशक्ती कमी होते.अवजड शेतातील कामे करता येत नाहीत यासह अनेक समस्याही जाणवत असल्याची जुनाट मानसिकता दिसून येते. मात्र असे काहीही होत नसून पुरुष नसबंदी पूर्णपणे सुरक्षित असून त्यामुळे पुरुषांचे शारीरिक बदल होत नाहीत. पुरुषप्रधान संस्कृती आणि मानसिकतेमुळे पुरुष नसबंदीला प्रतिसाद मिळत नाही. उलट या शस्त्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असून यामुळे पुरुषांना कोणत्याही अडचणी येत नाहीत. याबाबत गैरसमज अधिक असल्याने प्रतिसाद मिळत नाही.
- डॉ. दत्तात्रय बिरादार
वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय,अहमदपूर