लातूर : सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करणे, १०/२० लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमूदत संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
१४१० विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देणे, २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्याआधारे सातव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणे या सहा प्रमुख मागण्यासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. पहिल्या टप्प्यात परीक्षेच्या कामावर बहिष्कार, दुसऱ्या टप्प्यात मध्यान्न भोजन काळात निदर्शने, तिसऱ्या टप्प्यात काळ्या फिती लावून कामकाज तर चौथ्या टप्प्यात एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात आला. मात्र, शासनाने मागण्यांबाबत दखल न घेतल्याने सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
या महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग...महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सोमवारपासून पुकारला आहे. यामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद वाणिज्य, विज्ञान, कला व विधी महाविद्यालय, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय बाभळगाव आदींसह विविध महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.