लातूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा पाेलिस दल अलर्ट झाले असून, जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सात वेळा काेम्बिंग ऑपरेशन करून १८ तलवारी, घातक शस्त्रही जप्त केली आहेत. यावेळी अवैध धंद्यावर कारवाई केली असून, ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
लातूर लोकसभेसाठी निवडणुकीसाठी ७ मेरोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, निवडणूक विभाग आणि पाेलिस दल सज्ज झाले आहे. १६ मार्च ते २७ एप्रिलअखेर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाईसाठी विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली. काेम्बिंग ऑपरेशन, प्रत्येक पाेलिस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन, मोठ्या प्रमाणावर गावभेटी, गुन्हेगार आणि शांतता भंग करणाऱ्याविराेधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मटका-जुगारप्रकरणी जिल्ह्यात ९३ गुन्हे दाखल केले आहेत. तब्बल १४ लाख १० हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देशी-विदेशी दारू, चाेरट्या मार्गाने हाेणारी हातभट्टीची वाहतूक, निर्मिती, विक्री करणाऱ्याविरुद्ध एकूण ५२६ गुन्हे दाखल केले. २६ लाख ६८ हजार २८९ रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. हातभट्टी दारूसह, हजाराे लिटर रसायन नष्ट केले आहे.
नऊ आराेपी स्थानबद्ध; ‘एमपीडीए’ कारवाई...सामाजिक शांतता धाेक्यात आणणाऱ्या पाेलिसांच्या रेकाॅर्डवरील सराईत, अट्टल गुन्हेगार, गुंडाविराेधात ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. गत दीड वर्षाच्या कालावधीत नऊ आराेपींविराेधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. या काळात चार जणांविराेधात ‘एमपीडीए’नुसार कारवाई करण्यात आली आहे.
२३ ठिकाणी नाकाबंदी; हजाराे वाहनांची तपासणी...जिल्ह्यात विविध २३ ठिकाणी, जिल्ह्यासह आंतरराज्य सीमेवर ९ चेक पोस्ट/नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनाची तपासणी केली जात आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा शाेध घेत गुन्हा करण्याच्या तयारीतील दबा धरून बसलेल्याविराेधात गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय, विविध आरोपींकडून १८ तलवारींसह घातक शस्त्र जप्त केली आहेत. -साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक