राजकुमार जाेंधळे, लातूर : स्वत:वर बंदुकीने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणारे आयुक्त बाबासाहेब मनोहरे वापरत असलेले दोन्ही मोबाइल आणि बंदूक पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. घटनेच्या कारणांचा तपास करण्यासाठी पोलिस सर्व पुराव्यांची, घटनाक्रमाची पडताळणी करीत आहेत.ज्या बंदुकीने गोळी झाडली, ती बंदूक आणि काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर मंत्री, माजी मंत्री, आमदार, राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
सुरक्षा रक्षकाचा जबाब...
सुरक्षा रक्षकाने जबाबात म्हटले आहे, मी निवासस्थान परिसरात होतो. आवाज आल्याने घरात गेलो. दरवाजा तोडून जखमी आयुक्तांना रुग्णालयात नेले. त्यापूर्वी घरात काय घडले, याची मला माहिती नाही.
कुटुंबीयांची मन:स्थिती नाही...
पोलिस निरीक्षक सुधाकर देडे म्हणाले, कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांची बोलण्याची मन:स्थिती नाही. त्यामुळे अधिकृतपणे जबाब आलेला नाही.
कवटीचे फ्रॅक्चर; शस्त्रक्रिया यशस्वी
आयुक्त मनोहरे यांच्या डोक्यातून गोळी आरपार गेल्यामुळे उजव्या, डाव्या बाजूने कवटीतून रक्तस्राव होत होता. पहाटे २ ते सकाळी ५:३० अशी साडेतीन तास शस्त्रक्रिया झाली. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असून, उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
डोळे उघडले, उजवा हात उचलला...
शस्त्रक्रियेनंतर आयुक्तांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, ते डोळे उघडा म्हटले तर डोळे उघडत आहेत. उजवा हात व्यवस्थित उचलत आहेत. उजव्या हातांची हालचाल करा असे सांगितल्यानंतर ते करीत आहेत. डाव्या बाजूची हालचाल कमी आहे, असे न्यूरोसर्जन डॉ. हनुमंत किणीकर म्हणाले.