ज्या रुग्णांना अधिकचा न्यूमोनिया झाला आहे, अशाच रुग्णांमध्ये कोविडमुक्त झाल्यानंतरही फ्रायब्रोसिसचा त्रास वाढला आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक अधिक आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि त्यात कोविडयुक्त न्यूमोनिया असलेल्या रुग्णांना याचा त्रास जास्त असल्याचे ओपीडीतील डाॅक्टरांनी सांगितले.
कोविड रुग्णांना सुटी झालेल्या रुग्णांसाठी ही ओपीडी सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून तीन दिवस पोस्ट कोविड ओपीडीमध्ये तपासणी केली जाते. शिवाय, सुटी झालेल्या रुग्णांची फोनद्वारेही चौकशी केली जाते. ज्यांना त्रास आहे, त्यांना तपासणीसाठी बोलावले जाते. आतापर्यंत या ओपीडीतून ५०० ते ६०० जणांनी तपासणी करून घेतली आहे. या तपासणीत ४० ते ५० रुग्णांना फ्रायब्रोसिसचा त्रास असल्याचे निदर्शनास आले आहे.
पोस्ट कोविड ओपीडमध्ये ६०० जणांची तपासणी
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या पोस्ट कोविड ओपीडीमध्ये आतापर्यंत ५०० ते ६०० कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना घरीपण सेवा दिली जाते. फोनद्वारे समुपदेशन करून त्यांच्या प्रकृतीत झालेल्या बदलाबाबत मार्गदर्शन होते.
थकवा आणि दम लागणे असा होता त्रास
जास्त न्यूमोनिया असल्यामुळे ज्येष्ठांमध्ये फ्रायब्रोसिसच्या तक्रारी आहेत. अशा रुग्णांना थकवा आणि दम लागत होता. त्यांच्यावर पोस्ट कोविड ओपीडीमध्ये उपचार करण्यात आले आहेत. गरज असलेल्या रुग्णांसाठी औषध गोळ्यांचा कोर्स सुरू केल्यानंतर यातील बहुतांश रुग्णांचा त्रास कमी झाला आहे, अशी माहिती अधीक्षक डाॅ. संतोषकुमार डोपे यांनी दिली.
प्रोटीनयुक्त आहार आणि व्यायामावर द्यावे लक्ष
पोस्ट कोविड ओपीडीत ५०० ते ६०० जणांची तपासणी झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी हायप्रोटीन युक्त आहार घ्यावा. ज्यामध्ये तेलकट, फोडणीचे पदार्थ असू नयेत. धूम्रपान, मद्यपान टाळणे गरजेचेच. घरच्या घरी प्राणायाम व श्वसनाचे व्यायाम करणे आवश्यक असून, आयसोलेशनमध्येच आराम करणेही आवश्यक आहे. जेणेकरून त्रास कमी होईल. महत्त्वाचे प्रोटीनयुक्त आहार आणि श्वसनाचे व्यायाम गरजेचे असल्याचे पोस्ट कोविड ओपीडीचे प्रमुख डाॅ. अभिजीत यादव यांनी सांगितले.