लातूर : अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, त्याचे पंचनामे अद्यापही सुरू झालेले नाहीत. तर दुसरीकडे मात्र प्रधानमंत्री पीकविमा योजनेत नुकसानीनंतर ७२ तासांत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे.
मागील आठवड्यामध्ये जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत देवणी, निलंगा, औसा, जळकोट, उदगीर व लातूर तालुक्यातील काही भागांमध्ये सोयाबीन पिक पाण्यात वाहून गेले. शेंगांना झाडांवरच कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
त्यामुळे आता पीकविमा मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र या योजनेत आता नुकसानीनंतर ७२ तासांमध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल का, याचीच चिंता वाटत आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेचार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने पिक विमा अर्ज डाऊनलोड करून त्यावर माहिती भरण्याचे आवाहन केले आहे. नेमका अर्ज कसा भरावा, कोठे द्यावा, या संदर्भात कसलेही मार्गदर्शन प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हा अर्ज भरणे हेच मोठे संकट वाटत आहे.
त्यामुळे महसूल विभागांतर्गत सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून रबी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी मागणी शेतकरी करत आहेत.