लातूर : कृत्रिम बुद्धिमत्ता आपण अनुभवत आहोत़ लवकरच कृत्रिम भावनांसह संगणक तुमच्याशी प्रेमाने बोलेल, असे स्पष्ट करीत परम महासंगणकाचे जनक पद्मभूषण डॉ़ विजय भटकर यांनी भारतीय विज्ञानाची उज्ज्वल परंपरा विशद केली़
लातूर अर्बन बँक, माईर्स एमआयटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते मंगळवारी बोलत होते़ मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, इस्त्रोचे डॉ़ आलोककुमार श्रीवास्तव, प्रा़ राहुल कराड, निती आयोगाचे उन्नत पंडित, लातूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रदीप राठी, माजी खा़डॉ़ गोपाळराव पाटील, ललिता भटकर, मिलिंद पांडे, रमेश कराड, दिलीप माने आदींची उपस्थिती होती़ यावेळी इस्त्रोचे वैज्ञानिक डॉ़ आलोककुमार श्रीवास्तव यांचा विज्ञान श्रेष्ठ अॅवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ़ विजय भटकर म्हणाले, जगातील पहिले विद्यापीठ भारतात स्थापन झाले़ आजही विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतात आहे़ मी कोणत्याच पक्षाचा नाही़ सर्वच पक्ष चांगले़ देशात बहुपक्षीय राजकारणामुळे लोकशाही मजबूत होईल़ त्याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्र आहे़ राजकीय इच्छाशक्तीवर विज्ञान अन् प्रगती अवलंबून असते़